Belagavi

सिद्धरामय्या फक्त म्हैसूरचेच मुख्यमंत्री आहेत का? बी.वाय. विजयेंद्र यांचा सवाल

Share

आमदारांना परदेश दौऱ्याचे आमिष दाखवून स्वतःची खुर्ची वाचवण्याचे प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस सरकारने धनगर समाज आणि गरिबांच्या हिताकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र यांनी बेळगावमध्ये केली.

बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत विजयेंद्र यांनी राज्य सरकारवर जोरदार प्रहार केला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आपले पद टिकवण्यासाठी आमदारांना ‘परदेश प्रवास भाग्य’ उपलब्ध करून देत असल्याचा आरोप त्यांनी केला. मतदारसंघाच्या विकासासाठी निधी मागितल्यास पैसे नसल्याचे सांगणारे सरकार निर्लज्जपणे वागत असल्याची टीका त्यांनी केली. गरिबांची घरे आणि गंगा कल्याण योजनेसाठी निधी नसताना आमदारांच्या मर्जीसाठी पैसे उधळले जात आहेत. ‘अहिंदा’च्या नावावर सत्तेत आलेल्या मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या ‘अनुग्रह’ योजनेचे ४५ कोटी रुपये थकवून त्यांच्यावर अन्याय केल्याचे बी.वाय. विजयेंद्र यांनी म्हटले आहे.

गृहलक्ष्मी योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विजयेंद्र यांनी पाच हजार कोटी रुपये गेले कुठे, असा सवाल केला. विधानसभेत महेश टेंगिनकायी यांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री किंवा अर्थमंत्र्यांकडून अद्याप स्पष्ट उत्तर मिळालेले नाही. हा प्रचंड मोठा निधी इतर राज्यांकडे वळवला की त्याचा दुरुपयोग झाला, अशी शंका येत असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्याच्या अर्थमंत्र्यांनाच इतक्या मोठ्या रकमेची माहिती नसणे हे ‘आठवे आश्चर्य’ असल्याची कोपरखळी बी.वाय. विजयेंद्र यांनी लगावली.

राज्यात प्रादेशिक असमतोल वाढत असल्याचा इशारा देत विजयेंद्र यांनी आकडेवारी मांडली. प्रो. एम. गोविंदराज समितीच्या अहवालानुसार विषमतेचे प्रमाण ६० टक्क्यांवरून ७२.०८ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे फक्त म्हैसूरचे मुख्यमंत्री आहेत की संपूर्ण राज्याचे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कित्तूर आणि कल्याण कर्नाटक भागावर अन्याय होत असून मंत्री प्रियांक खर्गे केवळ आरडाओरडा करत आहेत, पण विकासासाठी काहीही करत नसल्याचा घणाघात बी.वाय. विजयेंद्र यांनी केला.

येत्या १९ फेब्रुवारी रोजी बेंगळुरूच्या पॅलेस ग्राऊंडवर भाजपची राज्य कार्यकारिणी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पक्ष संघटना, आगामी जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुका तसेच विधान परिषद निवडणुकांच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे. या बैठकीच्या समारोप प्रसंगी भाजपचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी.एल. संतोष मार्गदर्शन करणार असल्याची माहिती बी.वाय. विजयेंद्र यांनी दिली.

Tags: