Hukkeri

हुक्केरीत मोदी सरकारविरोधात ‘सीआयटीयू’ची निदर्शने

Share

हुक्केरी शहरात आज केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात ‘सीआयटीयू’ संघटनेने आक्रमक पवित्रा घेत जोरदार निदर्शने केली.

‘भारत बंद’च्या हाकेला प्रतिसाद देत तालुक्यातील अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, ग्रामपंचायत वॉटरमन आणि इतर १० कामगार संघटनांनी एकत्र येत केंद्र सरकारचा निषेध केला. शहरातील आंबेडकर उद्यानात हजारो कार्यकर्ते जमा झाले, तिथून भव्य रॅली काढत आंदोलकांनी कोर्ट सर्कल येथे रस्ता रोको केला. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. विविध विभागांत काम करणाऱ्या कामगारांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या ‘सीआयटीयू’च्या तालुकाध्यक्षा सी. एस. मगदूम यांनी माध्यमांशी बोलताना केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या हिताला बाधा आणणाऱ्या कामगार संहिता तातडीने रद्द कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. तसेच कामगारांना ईएसआय , पीएफ यांसारख्या सुविधा लागू कराव्यात आणि एफआरएस प्रणाली रद्द करावी, या प्रमुख मागण्यांसाठी आज अंगणवाडी केंद्रे बंद ठेवून या सार्वत्रिक संपात सहभाग घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आंदोलनानंतर सर्व कार्यकर्त्यांनी तालुका पंचायत आणि तहसील कार्यालयावर मोर्चा नेला. तिथे तहसीलदार बलराम कट्टीमणी यांच्यामार्फत केंद्र सरकारला आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी गोदावरी राजापुरे, यल्लाप्पा नाईक, शोभा संकन्नवर, सुरेखा कलमणी, लक्ष्मी तलवार, सुनीता चाळन्नवर, राजू हुद्दार, भारती मुत्यागोळ, सुनीता गस्ती यांच्यासह ‘सीआयटीयू’चे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: