बेळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या शासकीय नामनिर्देशित संचालकपदी बाळेश दासनट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल खानापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात दासनट्टी यांचा सत्कार करण्यात आला.
खानापूर तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक कार्यात सक्रिय असलेल्या बाळेश दासनट्टी यांची बीडीसीसी बँकेवर संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित सत्कार समारंभात ब्लॉक काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा सावित्री मादार यांनी, पक्षपातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मिळालेली ही संधी असल्याचे म्हटले.
या कार्यक्रमात पाच गॅरंटी योजनांच्या अंमलबजावणी प्राधिकरणाचे सदस्य बाबू हत्तरवाड यांच्या हस्ते नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी केपीसीसी सदस्य महादेव कोळी आणि प्रकाश मादार यांनीही मनोगत व्यक्त केले. या नियुक्तीमुळे सहकार क्षेत्रात पक्षाच्या कामाला गती मिळेल, अशी अपेक्षा यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला युवक काँग्रेसचे अध्यक्ष इसाक खान पठाण, तोहीद चांदखानवर यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments