बेळगावमधील उद्यमबाग येथील शांती केमिकल्स कारखान्यातून बाहेर पडणारे प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट रहिवासी भागातील विहिरींमध्ये झिरपत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. याप्रकरणी तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

उद्यमबाग परिसरातील जीआयटी कॉलेज जवळील राजाराम नगरमध्ये शांती केमिकल्स या औद्योगिक घटकाच्या निष्काळजीपणामुळे जनआरोग्य धोक्यात आले आहे. शांती केमिकल्स फॅक्टरीतून निघणारे रासायनिक अंशयुक्त पाणी जवळच्या वस्तीतील विहिरींमध्ये जात आहे. यामुळे पाण्याचा स्रोत पूर्णपणे प्रदूषित झाला असून पिण्याच्या पाण्याला उग्र वास येत असल्याने ते वापरणे अशक्य झाले आहे.
या दूषित पाण्याचा वापर करावा लागत असल्याने स्थानिकांना त्वचेचे विकार आणि इतर संसर्गजन्य आजारांची लागण होत आहे. कारखानदारांना वारंवार अवगत करूनही त्यांनी या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने स्थानिक रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
समस्या गंभीर रूप धारण करत असल्याने आज त्रस्त नागरिकांनी बेळगाव महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. संबंधित कारखान्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करावी आणि परिसरात पिण्याच्या पाण्याची पर्यायी सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


Recent Comments