Belagavi

एपीएमसी नियमांचे उल्लंघन करून बेळगावात अनधिकृत खासगी फूल मार्केट

Share

बेळगावात अधिकृत फूल मार्केट असतानाही, कोणत्याही परवानगीशिवाय सुरू झालेल्या अनधिकृत खासगी मार्केटमुळे सरकारी व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या व्यापाऱ्यांनी आज कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन हे मार्केट तात्काळ बंद करण्याची मागणी केली.

बेळगावच्या भरतेश शिक्षण संस्थेजवळ कोणतीही कायदेशीर परवानगी नसताना खासगी घाऊक फूल मार्केट सुरू करण्यात आले आहे. यामुळे शेतकरी सरकारी मार्केटऐवजी खासगी मार्केटला प्राधान्य देत असल्याने अधिकृत व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ मंचलवार सुदाम हरिविजय यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

एपीएमसीचे नियम धाब्यावर बसवून कॅन्टोन्मेंट परिसरात हे मार्केट सुरू झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राजकुमार टोपन्नवर यांनी केला. सरकारी मार्केटमध्ये लाखो रुपये खर्च करून गाळे घेतलेले व्यापारी आता देशोधडीला लागण्याची भीती आयेशा सनदी यांनी व्यक्त केली. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत खासगी मार्केट चालू देऊ नये, अशी मागणी सुजीत मुळगुंद यांनी केली.

कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ मंचलवार सुदाम हरिविजय यांनी या प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन व्यापाऱ्यांना दिले आहे.

Tags: