बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील नयानगर जवळ मलप्रभा नदीत तीन दुचाकी संशयास्पद रितीने फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. दुचाकींची चोरी केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी चोरट्यांनी हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे.
नयानगर जवळील मलप्रभा नदीच्या पात्रात तीन दुचाकी असल्याचे स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. बैलहोंगल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने या दुचाकी पाण्याबाहेर काढल्या. दुचाकी चोरल्यानंतर त्यांचा गैरवापर करून पकडले जाण्याच्या भीतीने त्या नदीत फेकून चोरटे पसार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
बाहेर काढलेल्या दुचाकींपैकी दोन दुचाकींना KA-25-G-1459 आणि KA-24-J-7907 अशा नंबर प्लेट आहेत, तर तिसऱ्या दुचाकीला नंबर प्लेट नाही. यावरून दुचाकी चोरांचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. सध्या बैलहोंगल पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद झाली असून पोलीस मूळ मालकांचा आणि चोरट्यांचा शोध घेत आहेत.
या प्रकरणाबाबत पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी सांगितले की, नदीपात्रातून होंडा शाइन, अपाची आणि स्प्लेंडर प्लस या दुचाकी आधीच बाहेर काढून जप्त करण्यात आल्या आहेत. सवदत्ती येथे झालेल्या सराफी पेढीवरील दरोड्यासाठी याच गाड्यांचा वापर करण्यात आला होता. गुन्हा केल्यानंतर आरोपींनी या दुचाकी नदीत फेकून दिल्याचा प्राथमिक अंदाज असून, या दिशेने तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी स्पष्ट केले.


Recent Comments