Belagavi

बेळगावात स्टंटबाज तरुणांना पोलीस अधीक्षकांचा दणका

Share

सार्वजनिक रस्त्यांवर स्टंटबाजी करणाऱ्या हुल्लडबाजांना जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी कठोर इशारा दिला आहे. वाढदिवसाच्या नावाखाली व्हीलिंग करून दहशत माजवणाऱ्यांवर आता ‘रौडीशीटर’ आणि हद्दपारीची कारवाई केली जाणार आहे. या धडक कारवाईमुळे स्टंटबाजांचे धाबे दणाणले आहेत.

बेळगाव जिल्ह्यात रस्त्यांवर अतिरेकी प्रदर्शन करणाऱ्या हुल्लडबाजांसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन आता कर्दनकाळ ठरले आहेत. वाढदिवसाच्या नावाखाली सार्वजनिक रस्त्यावर व्हीलिंग करून आपली ‘हवा’ करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांना त्यांनी चांगलाच इंगा दाखवला आहे. यापुढे अशा प्रकारचे कृत्य केल्यास गुंडांच्या यादीत नाव नोंदवून थेट हद्दपारीची कारवाई केली जाईल, असा कडक संदेश के. रामराजन यांनी दिला आहे.

बेळगाव जिल्ह्यातील मुरगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या राज्य महामार्गावरील नुग्गानट्टी क्रॉस जवळ ही घटना घडली. यरगट्टी येथील सुरेश भजंत्री याच्या वाढदिवसानिमित्त बेकायदेशीरपणे दुचाकींचे व्हीलिंग करण्यात आले होते. या कृत्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाड टाकून स्टंटसाठी वापरलेली एक महिंद्रा जीप आणि ११ दुचाकी जप्त केल्या आहेत. जिल्ह्यात सर्वसामान्यांना त्रास देऊन आपली दहशत निर्माण करण्यासाठी येथे जागा नाही, अशा स्पष्ट शब्दांत के. रामराजन यांनी इशारा दिला.

अशा धोकादायक वर्तनाची पोलीस कोणतीही गय करणार नाहीत, असे के. रामराजन यांनी यावेळी स्पष्ट केले. जर अशा घटनांची पुनरावृत्ती झाली तर संबंधितांची नावे तातडीने ‘रौडीशीटर’ यादीत समाविष्ट केली जातील. तरीही सुधारणा न झाल्यास त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे कठोर पाऊल उचलले जाईल, असे के. रामराजन यांनी सांगितले. नागरिकांनी अशा बेकायदेशीर प्रकारांची माहिती ‘कर्नाटक पोलीस ॲप’च्या माध्यमातून निनावीपणे पोलिसांना कळवावी, असे आवाहन के. रामराजन यांनी केले आहे.

Tags: