बेळगावात सुवर्ण विधानसौध समोर भरधाव कारने दुचाकीला जोराची धडक देऊन अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या कार चालकाचा पुढे जाऊन पुन्हा भीषण अपघात झाला असून कार पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. या दुर्घटनेत हलगा गावातील एक मजूर गंभीर जखमी झाला आहे.

बेळगाव तालुक्यातील हलगा-बस्तवाड येथील गवंडी कामगार देवेंद्र चौगुले हे आपल्या दुचाकीवरून बेळगावकडे जात होते. सुवर्ण विधानसौधच्या गेटसमोरून जात असताना मागून आलेल्या महाराष्ट्र पासिंगच्या कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात देवेंद्र चौगुले रस्त्यावर फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच हिरेबागेवाडी पोलिसांनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेत जखमीला सिव्हिल रुग्णालयात दाखल केले.
दुसरीकडे, दुचाकीला धडक दिल्यानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, गांधीनगर जवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कॅन्टरला या कारची भीषण धडक बसली. धडक इतकी जोरात होती की कारचा पुढचा भाग पूर्णपणे चिरडला गेला. या अपघातात कार चालकाला किरकोळ जखमा झाल्या आहेत. या सलग अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments