बेळगाव आणि कोकण विभागाला जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेल्या बेळगाव-वेंगुर्ला राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करावे, अशी मागणी माजी नगरसेविका नीलिमा पावशे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आली आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माजी नगरसेविका नीलिमा पावशे यांनी नागपूर येथे केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन हे निवेदन सादर केले. बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावर दररोज मोठी वाहतूक कोंडी होत असून, हा मार्ग कर्नाटक आणि महाराष्ट्रातील प्रमुख शहरांना जोडतो. गोव्यातील मोपा विमानतळ, सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ आणि रेडी बंदर गाठण्यासाठी बेळगाव व आसपासच्या तालुक्यांतील लोकांसाठी हाच मुख्य मार्ग आहे. चंदगड, आजरा, गडहिंग्लज, सावंतवाडी आणि गोवा भागातील वाहनांची या मार्गावर सतत वर्दळ असल्याने, या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देणे अनिवार्य झाले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
हा रस्ता विकसित झाल्यास बेळगाव भागातील कृषी उत्पादने, भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुलभ होईल. तसेच गोव्यातील सिमेंट, स्टील आणि कोकणचा हापूस आंबा व मासळीच्या निर्यातीला मोठा वेग येईल. या माध्यमातून संपूर्ण भागाच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळेल, असे नीलिमा पावशे यांनी स्पष्ट केले. यावेळी वसुंधराराजे भोसले, शैलजा खानविलकर आणि आमदार आशिष देशमुख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments