Khanapur

राज्यस्तरीय प्रतिभा कारंजी स्पर्धेत नंदगडची मरियम मुल्ला प्रथम

Share

जिद्द आणि प्रतिभा असेल तर ग्रामीण भागातील मुलेही गगनाला गवसणी घालू शकतात, हे खानापूरच्या या लेकीने सिद्ध करून दाखवले आहे. राज्यस्तरीय प्रतिभा कारंजी स्पर्धेत मरियम मुल्ला हिने आपल्या अफाट कौशल्याने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील नंदगड येथील एम.जी. हायस्कूलची दहावीची विद्यार्थिनी मरियम मुल्ला हिने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील राज्यस्तरीय प्रतिभा कारंजी आणि कलोत्सवात ऐतिहासिक कामगिरी केली. कोप्पळ येथे आयोजित या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत वैयक्तिक विभागातील ‘उर्दू भाषण’ स्पर्धेत मरियमने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावून शाळेची मान उंचावली आहे.

शालेय शिक्षण विभाग बेंगळुरू, कलुबर्गी अप्पर आयुक्त कार्यालय आणि कोप्पळ जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या स्पर्धेच्या समारोप समारंभात मरियम हिला प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. मरियम मुल्ला हिच्या या दैदीप्यमान यशाबद्दल शाळेतील शिक्षक, ग्रामस्थ आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिचे भरभरून कौतुक केले असून, ग्रामीण भागातील प्रतिभेने राज्याचे लक्ष वेधून घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला जात आहे.

Tags: