रामनगर-अळणावर महामार्गावर आज रक्ताचा सडा पडला. एका वळणावर झालेल्या भीषण रस्ते अपघातात सतरा वर्षीय तरुणाचा बळी गेला असून, दुसरा तरुण मृत्यूशी झुंज देत आहे.

खानापूर तालुक्यातील सुवातवाडी आणि कुंभार्डा गावांच्या दरम्यान असलेल्या वळणावर बोलेरो पिकअप आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मोहम्मद एजाज सिद्दीकी (१७, रा. बेटोडा फोंडा, गोवा) असे मृताचे नाव आहे. दुचाकीवर पाठीमागे बसलेला मोहम्मद याचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालक लतीफ तन्वी (२०) याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर सध्या बेळगावमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खानापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. रस्त्याच्या वळणावर वाहनांवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी खानापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


Recent Comments