Belagavi

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी ऐकल्या जनतेच्या तक्रारी; अनेक समस्यांचे जागीच निवारण

Share

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या ‘जनता दर्शन’ कार्यक्रमात आपल्या समस्या मांडण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

नेहमी जनसंपर्कात राहणाऱ्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज बेळगावच्या आपल्या जनसंपर्क कार्यालयात ‘जनता दर्शन’ घेतले. शिक्षण, मूलभूत सोयीसुविधा, मंदिरांचा विकास तसेच वैयक्तिक समस्या घेऊन आलेल्या नागरिकांचे प्रश्न त्यांनी शांतपणे समजून घेतले. यावेळी अनेक तक्रारींचे त्यांनी जागेवरच निवारण केले आणि संबंधित अधिकाऱ्यांना कामात हलगर्जीपणा न करण्याच्या सूचना दिल्या.

याप्रसंगी बोलताना मंत्री म्हणाल्या की, “बेळगाव ग्रामीण भागातील जनतेची सेवा करणे हे माझे सौभाग्य आहे. सरकारच्या कृषी शक्ती, अक्का कॅफे, संजीवनी महासंघ यांसारख्या योजना प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. यासाठी कृषी सखी आणि पशु सखींनी शेतकऱ्यांच्या घरापर्यंत जाऊन योजनांची माहिती द्यावी.” दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी सरकारने दुधाच्या दरात वाढ केल्याची माहितीही त्यांनी दिली. जनसेवा हीच माझी पहिली प्राथमिकता असल्याचे त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले.

यावेळी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, काडा अध्यक्ष युवराज कदम यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: