क्रीडा क्षेत्रात बेळगावच्या कीर्तीचा डंका पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाजला आहे. गोव्यात पार पडलेल्या १० व्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत बेळगावच्या डायनॅमिक शोटोकन कराटे संस्थेच्या खेळाडूंनी पदकांचा पाऊस पाडला आहे.

गोव्यातील म्हापसा येथे १ फेब्रुवारी रोजी शोटोकन कराटे-डो असोसिएशनच्या वतीने १० व्या आंतरराष्ट्रीय कराटे कप ‘नमस्ते’चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बेळगावच्या डायनॅमिक शोटोकन कराटे-डो संस्थेच्या ३६ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. काटा आणि कुमिते या दोन्ही विभागांत खेळाडूंनी अटीतटीची झुंज देत एकूण २४ सुवर्ण, ११ रौप्य आणि २५ कांस्य पदके आपल्या नावावर केली. या दणदणीत कामगिरीमुळे या संस्थेला स्पर्धेत ‘प्रथम जनरल चॅम्पियन’ होण्याचा बहुमान मिळाला आहे.
या ऐतिहासिक यशानंतर ८ फेब्रुवारी रोजी कंग्राळी खुर्द येथे विजयी खेळाडूंचा भव्य सत्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला मेघा मनोहर बेल्लंदकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. मल्लेष चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात मुख्य प्रशिक्षक नागेश पाटील, मितेश नीलकर आणि गौरव पाटील यांच्या मार्गदर्शनाचे कौतुक करण्यात आले. निधी पाटील, स्वराज पाटील, सान्वी पट्टणशेट्टी, सोहम लोहार यांसारख्या उदयोन्मुख खेळाडूंनी बेळगावच्या क्रीडा वैभवात मोलाची भर घातली आहे.


Recent Comments