महिला अधिकाऱ्याच्या घरातील बल्ब होल्डरमध्ये गुप्त कॅमेरे बसवल्याच्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, यामागे एका सरकारी अधिकाऱ्याचाच हात असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या धक्कादायक प्रकारामुळे पोलीस प्रशासनही चक्रावून गेले आहे.

व्यावसायिक वैमनस्यातून महिला अधिकाऱ्याची बदनामी करण्याच्या उद्देशाने हा कट रचण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणी विनोद टी या सरकारी अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीचे मोबाईल फोन जप्त केले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. महिला अधिकाऱ्याला बनावट पत्रकारांच्या मदतीने ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या ब्लॅकमेलिंगमधून मिळणाऱ्या पैशांमध्ये आरोपी विनोद आणि त्या बनावट पत्रकारांचा वाटा होता, अशी माहिती समोर येत आहे.
महिला अधिकाऱ्याचे खाजगी चित्रण करण्यासाठी घराच्या बल्ब होल्डरमध्ये एकूण ८ गुप्त कॅमेरे बसवण्यात आले होते. संबंधित महिला अधिकाऱ्यामुळेच आपली बदली झाली, असा राग मनात धरून विनोदने हा सूड उगवण्यासाठी टोकाचे पाऊल उचलल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुप्त कॅमेऱ्यांच्या माध्यमातून व्हिडिओ मिळवून त्याचा गैरवापर करण्याचा संपूर्ण कट पोलिसांनी उघड केला आहे. या प्रकरणी आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, महिला अधिकाऱ्याच्या कार्यालयातील आणखी एका अधिकाऱ्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ब्लॅकमेलिंगच्या पैशातून घर बांधण्याची आरोपीची योजना होती, असे समजते. अखेर पोलिसांनी सापळा रचून विनोद टी याला अटक केली असून त्याला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.


Recent Comments