अंगामध्ये जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल, तर शारीरिक व्यंग कधीही आडवे येत नाही, हे धारवाडच्या एका जिद्दी तरुणाने सिद्ध करून दाखवले आहे. तेलंगणात आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत या दिव्यांग तरुणाने यश मिळवून राज्यासह धारवाडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
तेलंगणातील करीमनगर येथे दोन दिवसांपूर्वी विशेष सक्षमीकरण (दिव्यांग) शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कर्नाटक, तेलंगणासह शेजारील राज्यांतील अनेक दिव्यांग शरीरसौष्ठवपटू सहभागी झाले होते. धारवाडमधील तेजस्वी नगर येथील हुसेन जमादार याने या स्पर्धेत उत्कृष्ट शरीरप्रदर्शन करत चौथे स्थान पटकावले आहे. हुसेनला आई-वडील नसूनही त्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे यश मिळवल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हुसेनच्या कमरेखालील भागात शक्ती नसतानाही त्याने आपल्या जिद्दीच्या जोरावर हा टप्पा गाठला आहे. ध्येय गाठण्यासाठी शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक बळ महत्त्वाचे असते, हेच त्याने जगाला दाखवून दिले. हुसेनच्या या यशाचे स्थानिक नागरिक गौरव करत असून, तरुण पिढीने वाईट व्यसनांपासून दूर राहून अशा प्रकारे खेळांकडे वळावे, अशी भावना व्यक्त होत आहे. हुसेनच्या या जिद्दीला आता सर्व स्तरातून सलाम केला जात आहे.


Recent Comments