बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ठेवींबाबत पसरवल्या जाणाऱ्या सर्व अफवांचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांनी आज खंडन केले. गेल्या तीन महिन्यांत बँकेच्या ठेवींमध्ये ५०० कोटींची वाढ झाली असून, बँक पूर्णपणे सुरक्षित असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अण्णासाहेब जोल्ले यांनी बँकेची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांना कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. बँकेतून १००० कोटींच्या ठेवी कमी झाल्याचा केला जाणारा दावा पूर्णपणे तथ्यहीन आहे. नवीन प्रशासन सत्तेवर आल्यापासून गेल्या तीन महिन्यांत बँकेच्या ठेवी ५५७५ कोटींवर पोहोचल्या आहेत, म्हणजेच त्यात ५०० कोटींची भर पडली आहे. बँकेबद्दल चुकीची माहिती पसरवणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली जात असून, महांतेश कडाडी यांना यापूर्वीच नोटीस बजावण्यात आली असल्याचे अण्णासाहेब जोल्ले यांनी सांगितले.
बँकेच्या कर्जवाटपाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांसाठी पीक कर्जाचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. यामध्ये ३०० कोटींचे विविध कर्ज, १२० कोटी साखर कारखान्यांना आणि १२०० कोटी रुपयांचे बिगरशेती कर्ज देण्यात आले आहे. इतर जिल्ह्यांप्रमाणेच येथेही शून्य टक्के व्याजाने प्रति एकर कर्जवाटप केले जात असून, कर्जाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय राज्य समिती घेणार असल्याचे अण्णासाहेब जोल्ले यांनी स्पष्ट केले.
बँकेच्या २०८१ कर्मचाऱ्यांच्या विम्याचा ५८ टक्के हप्ता बँक स्वतः भरत आहे. लक्ष्मी नारायण कारखान्याबाबत बोलताना, त्यांनी आतापर्यंत १४ कोटी रुपयांची परतफेड केली असून कोणतीही थकबाकी शिल्लक नसल्याची माहिती अण्णासाहेब जोल्ले यांनी दिली.
आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी जयशील शेट्टी यांच्या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले. केवळ ४ एकर वाणिज्य जमिनीच्या बदल्यात नियमानुसार कर्ज देण्यात आले असून, संबंधित मालमत्तेची किंमत १०० कोटींहून अधिक आहे. कर्जदाराने गेल्या ८ महिन्यांत ८ कोटींचे व्याज भरले असून, पाटबंधारे विभागाचे बिल येताच उर्वरित रक्कम भरण्याचे आश्वासन दिले आहे. रमेश कत्ती आणि महांतेश कडाडी हे जाणीवपूर्वक बँकेची बदनामी करत असून कडाडी यांनी माफी न मागितल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा भालचंद्र जारकीहोळी यांनी दिला. काही लोक पडद्यामागून हालचाली करून बँक बंद पाडण्याचा कट रचत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष राजू कागे यांच्यासह बँकेचे अन्य संचालक आणि पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments