Belagavi

मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी वणवणणाऱ्या माऊलीला तरुणांचा आधार

Share

आजारी मुलाच्या निधनानंतर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी हताश झालेल्या एका वृद्ध माऊलीच्या मदतीला सामाजिक कार्यकर्ते गंगाधर पाटील आणि त्यांची टीम धावून आली आहे. या तरुणांनी स्वतः पुढाकार घेऊन अंत्यविधी पार पाडत समाजात माणुसकीचे दर्शन घडवले आहे.

बेळगावच्या गोंधळी गल्लीतील रहिवासी किरण कितवाडकर (५४) यांचा तीन दिवसांपूर्वी राहत्या घरी आजारपणाने मृत्यू झाला होता. घरात केवळ त्यांची वृद्ध आई असल्याने आणि दुसरी कोणतीही सोय नसल्याने मृतदेहाची विल्हेवाट लावणे कठीण झाले होते. तीन दिवसांपासून पडून असलेल्या मृतदेहाला उंदीर आणि किड्यांनी कुरतडले होते, त्यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरली होती. आपल्या पोटच्या मुलाचा शेवटचा विधी कसा करायचा, या विवंचनेत ही माऊली हतबल होऊन अश्रू ढाळत होती.

स्थानिकांनी या घटनेची माहिती देताच गंगाधर पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. “आजी, घाबरू नका, आम्ही तुमचे मुलगे आहोत,” असे म्हणत त्यांनी त्या वृद्ध माऊलीला धीर दिला. त्यानंतर कुजलेल्या अवस्थेतील तो मृतदेह सन्मानाने बाहेर काढून त्यावर शास्त्रोक्त विधी केले आणि सदाशिव नगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पूर्ण केले.

या संकटकाळात देवदूतासारख्या धावून आलेल्या तरुणांचे आजींनी हात जोडून आभार मानले. या सेवाकार्यात गंगाधर पाटील यांच्यासोबत शंकर पाटील, निझार अहमद, विनायक पुजारी, निखिल घंटाणे, सौरभ गावडे, नितीन किल्लेकर, प्रसाद पडकुडे आणि ओंकार यांनी मोलाचे योगदान दिले.

Tags: