मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यापासून केवळ खोटे बोलण्याचे काम केले असून ते खोटारड्यांचे राजे आहेत, अशी बोचरी टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनी केली आहे. बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सिद्धरामय्या त्यांच्या कारकिर्दीत घडलेल्या एकाही चुकीच्या गोष्टीवर भाष्य करत नाहीत. काँग्रेस पक्ष पुन्हा कधीच सत्तेत येणार नाही, अशा आविर्भावात हे सरकार वागत असल्याचा घणाघात व्ही. सोमण्णा यांनी केला. बेंगळुरू मेट्रो प्रकल्पाबाबत भाष्य करताना त्यांनी काँग्रेसच्या श्रेयवादाचा समाचार घेतला.
मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी जे. एच. पटेल मुख्यमंत्री असतानाच झाली होती आणि आज लाखो नागरिक त्याचा लाभ घेत आहेत. शहरातील गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकार मेट्रो प्रकल्पाला मोठी आर्थिक मदत करत आहे, मात्र राज्य सरकार केंद्राच्या योजनांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप व्ही. सोमण्णा यांनी केला. राज्य सरकारच्या या दिशाभूल करणाऱ्या धोरणांना जनताच येणाऱ्या काळात चोख उत्तर देईल, असा इशारा व्ही. सोमण्णा यांनी दिला.


Recent Comments