Belagavi

कडोलीत कर्नाटक-महाराष्ट्र ‘हिंदकेसरी’ भव्य जंगी बैलगाडी शर्यत

Share

बेळगाव तालुक्यातील कडोली येथील स्वाभिमानी शेतकरी युवा संघटनेच्या वतीने शनिवार, ७ फेब्रुवारी आणि रविवार, ८ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘कर्नाटक-महाराष्ट्र हिंदकेसरी’ भव्य जंगी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.

केपीसीसी सदस्य आणि जिल्हा पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मलगौडा पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.

या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा सरचिटणीस प्रदीप एम. जे., माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अरुण कटांबळे, कडोली ग्रामपंचायत अध्यक्ष सागर मोहन पाटील आणि सुधीर मोहन पाटील उपस्थित होते. जिल्हा सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल प्रदीप एम. जे. यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला राजू मायण्णा, उदय सिद्दान्नावर व संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी नेहमीच क्रीडा क्षेत्राला आणि खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे. ग्रामीण भागातील पारंपारिक खेळ टिकवणे, त्यांची जोपासना करणे आणि ते खेळणे ही काळाची गरज असल्याचे मत मलगौडा पाटील यांनी व्यक्त केले.

बसवण्णा मंदिर परिसरातील मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत विजेत्यांना रोख रक्कमेसह आकर्षक बक्षिसे दिली जात आहेत. प्रथम क्रमांकासाठी ६१ हजार रुपये आणि मानाची गदा, द्वितीय क्रमांकासाठी ५१ हजार तर तृतीय क्रमांकासाठी ४१ हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. एकूण ३० हून अधिक बैलगाडी मालकांना सामाजिक कार्यकर्ते सुधीर मोहन पाटील यांच्या वतीने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती सुधीर मोहन पाटील यांनी दिली.

कडोली ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सागर पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या शर्यतीसाठी मैदानाची जय्यत तयारी केली आहे. ही स्पर्धा ‘युट्यूब लाईव्ह’च्या माध्यमातून जगभर पाहिली जात असून, स्पर्धेदरम्यान शिस्त राखण्यासाठी कडक नियम लागू करण्यात आले आहेत. जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन सागर मोहन पाटील यांनी केले आहे.

Tags: