Belagavi

मोबाईलच्या अतिवापरामुळे समाजाची दिशा भरकटतेय: चक्रवर्ती सुलीबेले

Share

बेळगाव येथील रामकृष्ण मिशनच्या वतीने आयोजित ‘शिक्षक व्यक्तिमत्त्व निर्माण’ मेळाव्यात प्रख्यात वक्ते चक्रवर्ती सुलीबेले यांनी शिक्षण आणि शिक्षकांच्या जबाबदारीबाबत परखड वास्तव मांडले. आजच्या मोबाईल युगात सामाजिक जाणीवा कशा नष्ट होत आहेत, याबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.

स्वामी विवेकानंद आणि भगतसिंग यांच्यासारख्या महापुरुषांनी आपल्या वयाच्या तिशीतच जगाला थक्क करणारे कार्य केले होते. मात्र, आजच्या काळात मानवी भावनाच मरत चालल्या आहेत. भावनांचीच समाधी झाल्यावर भावसमाधी कशी शक्य आहे, असा सवाल चक्रवर्ती सुलीबेले यांनी उपस्थित केला.

विद्यार्थ्यांमधील वाढत्या मोबाईलच्या व्यसनामुळे समाजाची दिशा चुकत असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. आजच्या पिढीमध्ये सामाजिक जागरूकता आणि जगण्याचे ध्येय हरवत चालले आहे. स्वामी विवेकानंदांनी गरीब आणि वंचितांच्या सेवेसाठी दिलेली हाक आजचा समाज विसरत चालला असल्याची खंत चक्रवर्ती सुलीबेले यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमात बेंगळुरू रामकृष्ण मठाचे अध्यक्ष पूज्य स्वामी नित्यस्थानंदजी महाराज यांनी ‘सहा मूलभूत मूल्ये’ आणि कानपूर रामकृष्ण मिशन आश्रमाचे सचिव पूज्य स्वामी आत्मश्रद्धानंदजी महाराज यांनी ‘शिक्षणाचा उद्देश’ या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान दिले.

Tags: