बेळगाव शहरापासून अवघ्या १३ ते १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या बेक्कीनकेरे गावात सध्या आनंदाचे आणि भक्तीचे वातावरण आहे. तब्बल ६६ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भरलेल्या श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रा महोत्सवाचा आज शुक्रवारी तिसरा दिवस असून, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे.


तब्बल ६६ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भरलेल्या श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणाहून भाविक दाखल होत आहेत. भाविकांना देवीचे दर्शन सुलभतेने घेता यावे यासाठी ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीच्या वतीने चोख नियोजन करण्यात आले आहे. यापूर्वी गावात पाण्याची गंभीर समस्या होती. मात्र आता पाण्यासह विविध समस्यां मार्गी लागल्याबद्दल यावेळी स्थानिकांनी समाधान व्यक्त केले. ६६ वर्षांपूर्वी आणि सध्याची गावातील परिस्थिती पाहता गावचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे हि आनंदाची बाब असल्याचे येथील रहिवासी डॉ. नितीन राजगोळकर यांनी सांगितले.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गावाबाहेर पार्किंगची सोय करण्यात आली असून, पिण्याचे पाणी आणि अखंड वीज पुरवठ्यासाठी हेस्कॉम विभागाने विशेष लक्ष दिले आहे. तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी आरोग्य विभाग सज्ज असून, पोलिस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात्राकाळात पाणी, स्वच्छता, पार्किंग यासह अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून नऊ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती यात्रा समितीच्या अध्यक्षांनी दिली.
बाहेरून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी ग्रामस्थांकडून आदरातिथ्य आणि सर्व सोयीसुविधा पुरवल्या जात असून, भंडाऱ्याची उधळण आणि उदो उदोच्या गजरात बेक्कीनकेरे येथील यात्रा पार पडत आहे.


Recent Comments