बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती तालुक्यात काल मध्यरात्री झालेल्या भीषण रस्ते अपघातात एकाचा बळी गेला आहे. भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅक्टरने पादचाऱ्याला धडक दिल्याने या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.

सवदत्ती तालुक्यातील बडली गावाजवळ काल मध्यरात्री ही घटना घडली. रेणुका शुगर फॅक्टरीकडून बैलहोंगलकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरने पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. या अपघातात महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याचे रहिवासी असलेले अशोक गायकवाड यांचा गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. अशोक गायकवाड हे कामानिमित्त या भागात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच सवदत्ती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून ट्रॅक्टर चालकाचा निष्काळजीपणा या अपघाताला कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या सवदत्ती पोलीस ठाण्यात याप्रकरणाची नोंद झाली असून पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.


Recent Comments