बेळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी अर्थसंकल्पातील विशेष निधीची वाट पाहण्याची गरज नाही. संबंधित विभागांकडे उपलब्ध असलेला निधी मंत्र्यांच्या स्वेच्छानिर्णयानुसार वापरून विकासकामे मार्गी लावता येतील, असे स्पष्टीकरण बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले.

बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सतीश जारकीहोळी म्हणाले की, जिल्हाधिकारी कार्यालय आणि रेल्वे उड्डाणपुलासारख्या महत्त्वाच्या कामांसाठी राज्य अर्थसंकल्पातील निधीवर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. विभागांकडे असलेला निधी वापरून ही कामे जलदगतीने पूर्ण करता येतील. निवडणूक व्यवस्थेतील बदलाबाबत संकेत देताना, आगामी ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुका ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे (बॅलेट पेपर) घेण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा विभाजनाच्या मागणीला आपला पाठिंबा असला, तरी यावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
नवलुतीर्थ जलाशयातून जुळ्या शहरांना पाणीपुरवठा करण्याबाबत बोलताना सतीश जारकीहोळी म्हणाले की, पिण्याच्या पाण्याची मागणी नाकारता येणार नाही; मात्र सध्या हिप्परगी जलाशयात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्या महाराष्ट्राकडून पाणी मागण्याची परिस्थिती नसली, तरी भविष्यात गरज भासल्यास सर्वपक्षीय सहकार्याने पाणी आणण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीबाबत त्यांनी महत्त्वाची भूमिका मांडली. काँग्रेस पक्ष या निवडणुकीत कोणताही हस्तक्षेप करणार नाही, ज्यांच्याकडे संख्याबळ आहे त्यांनी सत्ता चालवावी, असे म्हणत सतीश जारकीहोळी यांनी राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला.


Recent Comments