बेळगावच्या महांतेश नगर आणि श्रीनगर परिसरात आज भगवे वातावरण पाहायला मिळाले. हिंदू संमेलन समितीच्या वतीने आयोजित ‘विराट हिंदू संमेलना’च्या निमित्ताने सनातन संस्कृतीची जनजागृती करण्यासाठी भव्य शोभायात्रा काढण्यात आली.


शुक्रवार, ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी श्रीनगर सर्कलपासून या भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली. या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण म्हणजे शालेय मुलांसाठी आयोजित केलेली महापुरुषांची वेशभूषा स्पर्धा होती. यामध्ये शेकडो मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज, जगज्योती बसवेश्वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, स्वामी विवेकानंद, वीरराणी चन्नम्मा आणि क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांचे रूप साकारून इतिहासाला उजाळा दिला. “हिंदू आम्ही सर्व एक” अशा घोषणांनी हा परिसर दुमदुमून गेला होता. आपल्या पूर्वजांच्या त्याग आणि संघर्षामुळेच हिंदू संस्कृती टिकून असून ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे, अशी भावना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

महांतेश नगर, श्रीनगर आणि शिवबसवनगर येथील हजारो भाविक तसेच नागरिक या सोहळ्यात सहभागी झाले होते. एकसंघ समाजाच्या माध्यमातून राष्ट्राच्या उत्तीसाठी सर्वांनी एकत्र येण्याचा संकल्प यावेळी नागरिकांनी केला.



Recent Comments