Bagalkot

बागलकोटमध्ये रेशन तांदळाच्या काळ्याबाजाराला पोलिसांचेच अभय?

Share

बागलकोट जिल्ह्यात अवैध रेशन तांदळाच्या धंद्याने आता नवे वळण घेतले आहे. लूटलेला ट्रक पोलिसांनी जप्त केला असला, तरी त्याच्या खऱ्या मालकाचे नाव उघड करण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्याने अनेक शंका-कुशंका उपस्थित केल्या जात आहेत.

रबकवी-बनहट्टी तालुक्यातील सैदापूर जवळ १० जानेवारी रोजी रेशनच्या तांदळाने भरलेला ट्रक दरोडा टाकून पळवण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांच्या टोळीला अटक करून तांदळासह ट्रक जप्त केला. मात्र, या घटनेला महिना उलटून गेल्यानंतरही जप्त केलेला तांदूळ आणि तो ट्रक नेमका कोणाचा, याची माहिती पोलिसांनी गुप्त ठेवली आहे. यामुळे सर्वसामान्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, या रॅकेटमधील मुख्य सूत्रधारांना वाचवण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, असा प्रश्न विचारला जात आहे.

बागलकोटमधून महाराष्ट्र आणि हैदराबादला रेशनच्या तांदळाची मोठ्या प्रमाणावर तस्करी होते. अनेकवेळा कारवाया होतात, मात्र केवळ छोटे कामगार किंवा मजुरांवर गुन्हे दाखल करून पोलीस हात झटकून घेतात, असा आरोप होत आहे. सैदापूर प्रकरणात मालकाचे नाव उघड न करण्यामागे जप्त केलेला माल पुन्हा त्याच किंगपिनच्या घशात घालण्याचा हा डाव असल्याचा संशय बळावला आहे. गरीबांच्या पोटाचा घास काळ्या बाजारात विकला जात असताना प्रभावी व्यक्तींच्या रक्षणार्थ उभे राहिलेल्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे तपासाच्या पारदर्शकतेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Tags: