State

खासगी एअरलाईन्सच्या मनमानीवर कडाडी संसदेत कडाडले!

Share

एकेकाळी १३ शहरांशी जोडलेले बेळगावचे सांबरा विमानतळ आता केवळ ५ शहरांपुरतेच मर्यादित राहिल्याने राज्यसभा खासदार इरण्णा कडाडी यांनी संसदेत आक्रमक पवित्रा घेतला आहे. विमान फेऱ्या नफ्यात असतानाही सेवा बंद करणाऱ्या खासगी कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी कडाडी यांनी केंद्र सरकारकडे केली.

बेळगाव विमानतळ हे कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या तीन राज्यांच्या सीमेवर असून संरक्षण दलांचे महत्त्वाचे केंद्र आहे. केंद्र सरकारने २६२ कोटी रुपये खर्चून येथे नवीन टर्मिनल उभारले आहे, मात्र विमान कंपन्यांनी सेवा देण्याबाबत हात आखडता घेतल्याचे चित्र आहे. ‘उडान’ योजनेअंतर्गत जोपर्यंत सरकारी अनुदान मिळत होते, तोपर्यंत १३ शहरांसाठी विमानसेवा सुरू होती. मात्र, अनुदानाचा कालावधी संपताच कंपन्यांनी ही सेवा ५ शहरांपर्यंत मर्यादित केली आहे. या निर्णयामुळे बेळगावच्या औद्योगिक आणि शैक्षणिक विकासाला मोठा फटका बसत असल्याची चिंता संसदेत व्यक्त करण्यात आली.

बेळगाव ते मुंबई, दिल्ली आणि बेंगळुरू या मार्गांवर ८५ ते ९५ टक्के प्रवासी उपलब्ध आहेत. प्रवासी संख्या आणि महसूल वाढलेला असतानाही विमान कंपन्यांनी उड्डाणे थांबवणे हे दुर्दैवी आहे. २०२४-२५ मध्ये प्रवाशांच्या संख्येत ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने अशा कंपन्यांना कडक सूचना देऊन मुंबई, पुणे, चेन्नई आणि जयपूर या शहरांसाठी विमानसेवा तातडीने पूर्ववत करावी, अशी मागणी इरण्णा कडाडी यांनी यावेळी केली.

Tags: