Belagavi

न्यू गुडशेड रोडवरील श्री गणेश मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठापना; महाप्रसादासाठी भक्तांची अलोट गर्दी

Share

बेळगावमधील न्यू गुडशेड रोड येथील ५ व्या क्रॉस गल्लीत आज भक्तीचा जागर पाहायला मिळाला. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या श्री गणेश मंदिराचे जीर्णोद्धार कार्य पूर्ण झाले असून, आज अत्यंत वैभवशाली स्वरूपात मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, विविध धार्मिक विधी आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

न्यू गुडशेड रोड येथील श्री गणेश मंदिराच्या नूतन वास्तूमध्ये श्री गणेश, मूषक आणि उत्सव मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आली. १ फेब्रुवारी रोजी शहापूर येथील शिवाजी उद्यानापासून निघालेली भव्य शोभायात्रा मंदिरात पोहोचल्यानंतर, ज्येष्ठ पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली विविध होम-हवन आणि कलशारोहण सोहळा पार पडला. या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

आज शुक्रवारी दुपारी १२ वाजता भव्य महाआरती संपन्न झाली, मंदिर परिसरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील हजारो भाविकांनी शिस्तबद्ध रांगेत उभे राहून श्रींचे दर्शन घेतले आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. भजन, कीर्तन आणि जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. मंदिराचे विश्वस्त विश्वनाथ झाड यांनी मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या विविध टप्प्यांची माहिती दिली आणि या कार्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व भाविकांचे आभार मानले.

जीर्णोद्धाराच्या या ऐतिहासिक सोहळ्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री गणेशाचा आशीर्वाद घेतला.

Tags: