Belagavi

बेळगावात बालभवनाच्या मुलांसाठी हायटेक बॉक्स क्रिकेट मैदान सज्ज

Share

बेळगावमधील बालभवनाच्या मुलांसाठी नूतनीकरण करण्यात आलेल्या इनडोअर बॉक्स क्रिकेट मैदानाचे गुरुवारी थाटात उद्घाटन करण्यात आले. जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते या हायटेक मैदानाचा लोकार्पण सोहळा पार पडला.

जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महिला व बालविकास विभाग आणि जवाहर बालभवन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने या मैदानाची उभारणी करण्यात आली आहे. उद्घाटनप्रसंगी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी चेंडू फेकला, तर पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि आमदार आसिफ सेठ यांनी बॅटिंगचा आनंद लुटला. बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, आमदार चन्नराज हट्टीहोळी यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले की, क्रिकेट प्रेमी मुलांच्या सोयीसाठी जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांच्या पुढाकाराने हे मैदान विकसित करण्यात आले आहे. यासाठी बालभवनचे २० लाख आणि आमदारांच्या निधीतून २० लाख असा एकूण ४० लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. सरकारी शाळेतील प्रतिभावान खेळाडू मुलांना येथे मोफत प्रशिक्षण आणि निवासाची सोय केली जाईल.

तसेच ५ दिव्यांग खेळाडूंनाही यात विशेष संधी देण्यात आली असून, आगामी स्पर्धांसाठी त्यांना तयार केले जाईल, अशी माहिती लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.

Tags: