बेळगाव तालुक्यातील बडाल अंकलगी येथील कौरी गु़ड्ड परिसरात झाडांची बेसुमार कत्तल होऊनही वनविभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही. याच्या निषेधार्थ शुक्रवारी शेतकरी संघटना आणि भाजप नेत्यांनी वनविभागाच्या कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन केले.

बडाल अंकलगी गावात एका खासगी कंपनीच्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे. वनविभागाने केवळ नावापुरती चौकशी केली असून, अद्याप संबंधित विकासकावर कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही, असा आरोप आंदोलकांनी केला आहे.
कौरी गु़ड्ड परिसर हा हजारो मोर आणि इतर वन्यजीवांचे आश्रयस्थान आहे. माणसांप्रमाणेच पशु-पक्ष्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, मग झाडांची कत्तल करून येथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची गरजच काय, असा संतप्त सवाल यावेळेस उपस्थित करण्यात आला.
ऐतिहासिक वारसा असलेल्या कौरी गु़ड्ड वनक्षेत्रातील ५० एकरपेक्षा जास्त जागेवरील उभी झाडे तोडून पाडण्यात आली आहेत. हा हिरवागार परिसर नष्ट करण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारीच जबाबदार असल्याचा घणाघातही यावेळी करण्यात आला.
या आंदोलनात भाजप नेते धनंजय जाधव, प्रेम चौगुला, वाजीद हिरेकुडी, बसंनगौडा पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा या नेत्यांनी दिला आहे.


Recent Comments