बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बिडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या मुजोरीमुळे एका चिमुकल्याचा जीव टांगणीला लागला होता. रात्रीच्या वेळी मृत्यूशी झुंज देणाऱ्या बालकासाठी रुग्णालयाचे दरवाजे न उघडणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सरकारी आरोग्य यंत्रणेचे वाभाडे निघाले असून, या प्रकारावर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
हावेरी येथून रोजगारासाठी बिडी येथे आलेल्या एका गरीब कुटुंबातील वर्षभराच्या मुलाची प्रकृती बुधवारी रात्री अचानक ढासळली. घाबरलेले पालक त्याला घेऊन धावत आरोग्य केंद्रात पोहोचले, मात्र तेथील नर्सिंग कर्मचाऱ्यांनी साधी माणुसकीही दाखवली नाही. “आम्ही उपचार करणार नाही, नंदगडला घेऊन जा” असे सांगून त्यांनी रुग्णालयाचे कुलूप उघडण्यासही नकार दिला. मध्यरात्रीच्या वेळी मदतीसाठी कोणीही नसल्याने हतबल पालक आपल्या मुलाला कडेवर घेऊन रुग्णालयाच्या गेटसमोर रडत उभे होते.
या घटनेची माहिती मिळताच पत्रकार नागेश नाईक यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कर्मचाऱ्यांना वारंवार विनंती केली, मात्र कर्मचाऱ्यांनी रुग्णालय उघडले नाही. अखेर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नाईक यांनी माणुसकी दाखवत आपल्या स्वतःच्या वाहनातून त्या बाळाला तातडीने नंदगड येथील रुग्णालयात दाखल केले. पत्रकाराच्या या तत्परतेमुळे बाळाचे प्राण वाचले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश किवडसण्णवर संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Recent Comments