Bagalkot

बागलकोटच्या नवनगरमध्ये मंदिर-मशिदीचा वाद पेटला

Share

बागलकोटच्या नवनगरमध्ये सध्या धार्मिक स्थळांच्या अतिक्रमणावरून मंदिर आणि मशीद असा वाद उफाळून आला आहे. अनधिकृत मशिदी हटवण्याच्या हिंदू संघटनांच्या मागणीनंतर, आता मुस्लीम संघटनांनीही अनधिकृत मंदिरांवर कारवाई करण्याची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली आहेत.

नवनगर परिसरात विनापरवाना मशिदींचे निर्माण कार्य सुरू असल्याचा आरोप करत हिंदू संघटना आणि नागरिक हितरक्षण वेदिकेने जिल्हाधिकारी व बीटीडीए अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. बीटीडीएच्या नियमांचे उल्लंघन करून या मशिदी उभारल्या जात असल्याचा दावा करत गिरीश भांडगे व इतर कार्यकर्त्यांनी यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. या तक्रारीची दखल घेत प्रशासनाने मशिदींना नोटिसा बजावल्या आहेत.

प्रशासनाच्या या भूमिकेचा निषेध करण्यासाठी मुस्लीम संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. नवनगरमधील शेडमध्ये असलेल्या मशिदींना नोटिसा देणे चुकीचे असल्याचे सांगत मुस्लीम नेते अयुब यांनी संताप व्यक्त केला. बीटीडीएच्या बैठकीत पाच मशिदींना अधिकृत मंजुरी मिळाली असून, इतर मशिदींच्या मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. जिथे परवानगी मिळाली आहे तिथेच तात्पुरती शेड उभारली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उलट नवनगरच्या विविध सेक्टरमध्ये अनधिकृत मंदिरे उभारली गेली आहेत, ती आधी हटवावीत, अशी मागणी ए. बी. आदापूर आणि इतर मुस्लीम नेत्यांनी केली आहे. जोपर्यंत अनधिकृत मंदिरांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Tags: