Belagavi

समर्थनगरमधील बेकायदा ले-आउटवर अखेर ‘बुडा’चा हातोडा

Share

बेळगावातील समर्थनगर भागात नियमांची पायमल्ली करून उभारल्या जाणाऱ्या बेकायदा ले-आउटवर अखेर प्रशासनाने कारवाई केली आहे. स्थानिक रहिवाशांच्या प्रदीर्घ लढा आणि आंदोलनानंतर ‘बुडा’च्या अधिकाऱ्यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचून अनधिकृत बांधकाम पाडून टाकले.

समर्थनगरमधील सर्व्हे नंबर ४०३/१ आणि ४०३/२ मध्ये कोणत्याही परवानगीशिवाय हे बेकायदा ले-आउट उभारले जात होते. याविरोधात टीचर्स कॉलनी आणि बडीवाले कॉलनीतील नागरिकांनी रस्त्यावर उतरून तीव्र निषेध नोंदवला होता. येथे शेकडो झाडांची बेसुमार कत्तल करण्यात आली असून, नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमण करून अवैज्ञानिक पद्धतीने रस्ते तयार करण्यात आले होते. या कृत्यामुळे पावसाळ्यात परिसरातील घरांमध्ये सांडपाणी शिरण्याची भीती निर्माण झाली होती, ज्यामुळे रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण होते.

गेल्या एप्रिल महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात होता. मात्र, आज बेळगाव नगरविकास प्राधिकरणाचे आयुक्त आणि अभियंत्यांच्या पथकाने अचानक भेट दिली. अधिकाऱ्यांनी बुलडोझरच्या साहाय्याने अनधिकृतपणे बांधलेले रस्ते आणि गटारे जमीनदोस्त केली असून ले-आउट मालकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Tags: