Belagavi

बेळगावच्या शांताई वृद्धाश्रमात श्री स्वामी समर्थ आणि विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना

Share

बेळगावमधील शांताई वृद्धाश्रमात आज भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आश्रमाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा अत्यंत श्रद्धापूर्वक पार पडला.

शांताई वृद्धाश्रमात बुधवार, ४ फेब्रुवारी रोजी श्री स्वामी समर्थ आणि श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींचा प्राणप्रतिष्ठापना महोत्सव मोठ्या थाटात साजरा झाला. या निमित्ताने सकाळी वामनवाडी गावापासून आश्रमापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. दुपारी १२ वाजता शास्त्रोक्त पद्धतीने मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. याच वेळी आश्रमाच्या ‘चंदन कमल’ या नियोजित नूतन इमारतीचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यामुळे निराधारांना हक्काचा निवारा मिळण्याच्या योजनेचा शुभारंभ झाला आहे.

धार्मिक विधींनंतर आयोजित महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. संध्याकाळी आजरा वारकरी मंडळाच्या वतीने झालेल्या भजन आणि कीर्तनाने उपस्थित मंत्रमुग्ध झाले. आश्रमाचे कार्याध्यक्ष विजय मोरे आणि शांताई परिवाराने या कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते.

आत्तापर्यंत १५४९ अनोळखी मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले असून ‘रद्दीतून बुद्धीकडे’ आणि ‘शांताई वृद्धाश्रम’ यांसारख्या उपक्रमांसाठी विजय पाटील व नागेश पाटील यांची मोठी प्रेरणा लाभली असल्याचे विजय मोरे यांनी यावेळी सांगितले.

वृद्धांच्या सेवेसोबतच आश्रमात सुरू असलेल्या या आध्यात्मिक उपक्रमांचे स्थानिकांकडून कौतुक होत आहे.

Tags: