खानापूर तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींची पंचवार्षिक मुदत संपल्यामुळे आता तिथे प्रशासकीय राजवट सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केले असून, निवडणुका होईपर्यंत विकासकामांची धुरा अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे.
बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी खानापूर तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या सुरळीत कामकाजासाठी प्रशासकांची नियुक्ती केली आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३ (ई) आणि कर्नाटक ग्राम स्वराज आणि पंचायत राज अधिनियम १९९३ अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे. २०२५ पर्यंतची मुदत संपताच या अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत राज, कृषी आणि पशुसंवर्धन अशा विविध विभागांतील अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून निवड करण्यात आली आहे. नवीन निवडणुका होऊन अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड होईपर्यंत हे अधिकारी पंचायतीचे सर्व अधिकार बजावतील. मुदत संपल्याने पंचायत कार्यालयांतील जुन्या सदस्यांच्या नावाच्या पाट्या हटवण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.
या नियुक्त्या पदनिहाय करण्यात आल्या असून, संबंधित अधिकाऱ्याची बदली झाली तरी त्या पदावर येणारा नवीन अधिकारी प्रशासक म्हणून काम पाहील, असे मोहम्मद रोशन यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.


Recent Comments