Belagavi

ह़िरेबागेवाडी भूखंड घोटाळ्याचा सखोल तपास सुरू

Share

बेळगाव जिल्ह्यातील ह़िरेबागेवाडी गावात उघडकीस आलेला भूखंड घोटाळा आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. सार्वजनिक मालमत्तेची माहिती दडवणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रारदारांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने, तालुका पंचायत सहाय्यक संचालकांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

ह़िरेबागेवाडी गावातील नवीन लेआउटमध्ये सार्वजनिक उपयोगासाठी राखीव असलेल्या जागांची बेकायदेशीर विक्री आणि माहिती दडवल्याच्या आरोपावरून मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली. या चौकशीसाठी आलेले तापां सहाय्यक संचालक बी. डी. कडेमनी यांच्यासमोर तक्रारदार बी. एस. गाणगी आणि उमेश नंदी यांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. लेआउटचे नकाशे आणि सार्वजनिक मालमत्तेचे सातबारा उतारे देण्यास टाळाटाळ करण्यामागे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हात आहेत का, असा संतप्त सवाल बी. एस. गाणगी यांनी उपस्थित केला.

तक्रारदारांची मागणी लक्षात घेता, चौकशी अधिकाऱ्यांनी पुढील तीन दिवसांच्या आत सर्व लेआउटमधील सार्वजनिक मालमत्तेचे उतारे सादर करण्याचे निर्देश ग्रामपंचायत सचिव कृष्णा पाटील यांना दिले. तसेच सार्वजनिक जागांवर नामफलक लावून कुंपण घालण्याचे आणि अधिकृत कागदपत्रे नसलेल्या लेआउटचे काम तात्काळ थांबवून मालकांना नोटीस बजावण्याचे आदेश बी. डी. कडेमनी यांनी दिले. या बैठकीला ग्रामपंचायत अध्यक्षा जयश्री जप्ती यांच्यासह गावातील प्रमुख नागरिक उपस्थित होते.

Tags: