पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्रानेच मित्राला संपवल्याची खळबळजनक घटना बागलकोटमध्ये घडली आहे.

एकीकडे आमराईत पडलेला मृतदेह, तर दुसरीकडे दारूच्या नशेत डोक्यात दगड घालून हत्या करणारा मित्र. बागलकोटचे पोलीस अधीक्षक सिद्धार्थ गोयल आणि बादामीच्या सीपीआय यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. काकनूर येथील सोमशेखर किल्लीक्यातर (४२) या मजुराची निर्घृण हत्या करण्यात आली असून, पतीच्या निधनानंतर पत्नी नेत्रावती हिने पोलिसांसमोर केलेला आक्रोश मन हेलावणारा होता.
आमराईत सोमशेखरचा चेहरा दगडाने ठेचून हत्या करणारा दुसरा तिसरा कोणी नसून त्याचा मित्र संजय किल्लीक्यातर असल्याचे निष्पन्न झाले आहे. बादामी पोलिसांनी आरोपी संजयला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. सोमशेखर हा आपली पत्नी आणि संजय यांच्यातील संबंधांवर वारंवार संशय घेत असे. या वादाला कंटाळून संजयने सोमशेखरला आंबा बागेत नेले, त्याला तिथे भरपूर दारू पाजली आणि तो नशेत असताना डोक्यात मोठा दगड घालून त्याची हत्या केली.
माझा पती आणि संजय मित्र होते, पण संशयापायी हे सर्व घडले, अशी प्रतिक्रिया मृताची पत्नी नेत्रावती हिने दिली. तर, घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर आरोपीला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक सिद्धार्थ गोयल यांनी सांगितले.
एकत्र काम करणाऱ्या दोन मित्रांमधील संशयाचा हा सुडाचा प्रवास एकाच्या मृत्यूने आणि दुसऱ्याच्या अटकेने थांबला आहे. या हत्येचे नेमके कारण आणि अधिक तपशील पोलीस तपासात लवकरच स्पष्ट होतील.


Recent Comments