बेळगावच्या वंटमुरी येथे महिलेला विवस्त्र करून अमानुष मारहाण केल्याच्या घटनेत आज न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. सुसंस्कृत समाजाला मान खाली घालायला लावणाऱ्या या कृत्यातील सर्व १२ दोषींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.

बेळगावचे अतिरिक्त १० वे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एच. एस. मंजुनाथ यांनी आज शिक्षेचे प्रमाण जाहीर केले. बसप्पा नाईक, राजू नाईक यांच्यासह एकूण १२ दोषींना विविध कलमांखाली कठोर कारावास आणि दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन शिक्षा जाहीर होताच, न्यायालय परिसरात उपस्थित असलेल्या दोषींनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी एकच टाहो फोडला.
महिलेवरील अत्याचारामुळे या प्रकरणाने संपूर्ण राज्यभरात खळबळ उडवून दिली होती. सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील एल. एस. सुळ्ळद यांनी बाजू मांडली. अखेर न्यायालयाने उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे, समाजात जरब बसवण्यासाठी ही कठोर शिक्षा जाहीर केली. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांसाठी हा निकाल म्हणजे एक कडक इशारा असल्याचे मानले जात आहे.


Recent Comments