राज्याची राजधानी बेंगळुरूमध्ये प्रसिद्ध उद्योजक सीजे रॉय यांच्या निगूढ मृत्यूने मोठी खळबळ उडवून दिली आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या छळाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप होत असतानाच, गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीचे आदेश दिले आहेत.
बेंगळुरू येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना जी. परमेश्वर यांनी घटनेचा तपशील मांडला. गेल्या डिसेंबरमध्ये सीजे रॉय यांच्या कंपन्यांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. नियमानुसार ६० दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्याची मुदत ४ फेब्रुवारी रोजी संपणार होती, त्यामुळे अधिकारी रॉय यांची चौकशी करत होते. तीन दिवसांपूर्वीच दुबईहून परतलेले रॉय अधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना, ‘पाच मिनिटांत येतो’ असे सांगून आत गेले आणि त्यांनी आत्महत्या केली. बराच वेळ बाहेर न आल्याने पोलिसांनी दरवाजा तोडला असता ही घटना उघडकीस आल्याचे जी. परमेश्वर यांनी सांगितले.
या मृत्यूमागे आयकर विभागाचा छळ कारणीभूत असल्याची शंका कुटुंबीयांनी व्यक्त केली असली, तरी सध्या केवळ ‘मृत्यूच्या कारणांचा’ तपास करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले. तपास अहवाल आल्यानंतरच सत्य समोर येईल, असे जी. परमेश्वर यांनी नमूद केले. तसेच उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यावरील आरोपांबाबत विचारले असता, प्राथमिक चौकशीच्या अहवालानंतर पुढील पावले उचलली जातील, असे जी. परमेश्वर यांनी म्हटले. सध्या पोलीस रॉय यांचे शेवटचे कॉल रेकॉर्ड्स आणि त्यांच्या मानसिक स्थितीचा सखोल तपास करत आहेत.


Recent Comments