Belagavi

निवडणुकीसाठी वाहणारी ‘दारूची नदी’ पोलिसांनी रोखली; बेळगावात ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

Share

सीमावर्ती जिल्हा असलेल्या बेळगावात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गोव्याहून महाराष्ट्रातील निवडणुकीच्या रिंगणात पुरवठा केली जाणारी तब्बल ४० लाख रुपये किमतीची अवैध दारू माळमारुती पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून पकडली आहे.

महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना वाटण्यासाठी अवैध दारूचा आधार घेतला जात असल्याने सीमाभागात खळबळ उडाली आहे. आज पहाटे माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकली. KA-27-C5419 क्रमांकाचा कॅंटर अडवून झडती घेतली असता, सुरुवातीला त्यात जुन्या प्लास्टिक बाटल्या आणि काचेच्या भंगाराच्या गोण्या भरल्याचे दिसले. मात्र, संशय आल्याने पोलिसांनी कसून तपासणी केली असता, त्या गोण्यांच्या खाली अतिशय शिताफीने लपवलेला दारूच्या बॉक्सचा मोठा साठा आढळून आला.

ही यशस्वी कारवाई डीसीपी बरमनी, एसीपी संतोष सत्यनायक आणि सीपीआय बी. आर. गडेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलिसांनी सुमारे ८०० हून अधिक दारूचे बॉक्स जप्त केले असून, वाहनासह या मुद्देमालाची एकूण किंमत ४० लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. अटक करण्यात आलेल्या चालकाची चौकशी केली असता, ही दारू महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी नेली जात असल्याचे समोर आले आहे. या तस्करीमागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास चक्रे वेगाने फिरवली आहेत.

Tags: