Belagavi

बेळगावमध्ये रंगला ‘जिन नामस्मरण’ जप सोहळा; विश्वविक्रमाकडे जैन समाजाची वाटचाल

Share

विश्वशांतीच्या संकल्पाने आज बेळगावमध्ये एका अभूतपूर्व धार्मिक विक्रमाची नोंद झाली. राज्यातील विविध ठिकाणी एकाच वेळी आयोजित ‘श्री जिन नामस्मरण’ सोहळ्यात हजारो भाविकांनी सहभाग नोंदवत भक्तीचा महिमा अधोरेखित केला.

विश्वशांती युवा सेवा समिती बेंगळुरू आणि जैन युवा संघटना बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगावच्या धर्मनाथ भवन येथे ‘श्री जिन नामस्मरण’ विश्वविक्रम सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक विधीत ८५० हून अधिक श्रावक-श्राविकांनी भक्तिभावाने सहभाग घेतला. कर्नाटकातील २७ जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी पार पडलेल्या या मोहिमेत देशभरातून सुमारे १५ ते २० हजार भाविक सहभागी झाले असून, या उपक्रमाची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे, भाविकांच्या सहभागाच्या बाबतीत बेळगाव जिल्ह्याने संपूर्ण देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. माजी आमदार संजय पाटील आणि जैन युवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दीपप्रज्वलन करून जिन नामाचे महत्त्व आणि विश्वशांतीसाठी आयोजित होम-हवनाबाबत माहिती दिली.

अशा धार्मिक कार्यक्रमांमुळे समाजात शांतता आणि एकजूट निर्माण होते, असे मत अभय अवलक्की यांनी व्यक्त केले. विश्वशांतीसाठी हा जप आणि विधी केला जात असून, देशातील २७ हून अधिक ठिकाणी एकाच वेळी हा कार्यक्रम पार पडल्याने याची नोंद जागतिक स्तरावर होईल, असे अभय अवलक्की यांनी म्हटले.

जागतिक शांततेसाठी जैन समाजाने हा मोठा उपक्रम हाती घेतला असून, यात १५ ते २० हजार समाजबांधव सहभागी होत असल्याची माहिती पुष्पंक हणमण्णवर यांनी दिली.

Tags: