Belagavi

कृष्णेला पाणी रमेश जारकीहोळींनीच आणले; माजी आमदार महेश कुमठळ्ळी यांचा आमदार लक्ष्मण सवदींवर घणाघात

Share

कृष्णा नदीत पाणी सोडण्याचे खरे श्रेय केवळ रमेश जारकीहोळी यांचेच असून, सध्याचे लोक या प्रश्नावर केवळ राजकारण करत असल्याची घणाघाती टीका माजी आमदार महेश कुमठळ्ळी यांनी केली आहे. शनिवारी कागवाड येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सिंचन प्रकल्पांच्या श्रेयावरून आमदार लक्ष्मण सवदी यांच्यावर निशाणा साधला.

२०१५ पूर्वी श्रीमंत पाटील आणि आम्हाला सोबत घेऊन रमेश जारकीहोळी यांनीच पुढाकार घेतला होता. त्यांच्याच पाठपुराव्यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्यातून कृष्णा नदीत २ टीएमसी पाणी सोडणे शक्य झाले, असे महेश कुमठळ्ळी यांनी सांगितले. सतीश जारकीहोळी यांना अथणी मतदारसंघाबद्दल आस्था आहे, मात्र अथणीचा विकास झाला तर गोकाकचा विकास होईल, असे चुकीचे चित्र उभे करून काही लोक लोकांची दिशाभूल करत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

अम्माजेश्वरी उपसा सिंचन योजनेचे खरे जनक रमेश जारकीहोळीच असून, आम्ही आमदार असतानाच या योजनेसाठी १४८६ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली होती, असे महेश कुमठळ्ळी यांनी स्पष्ट केले. अथणी आणि कागवाड मतदारसंघातील सिंचन योजनांना जारकीहोळी यांनीच निधी मिळवून दिला, मात्र आताचे आमदार कामापेक्षा राजकारणालाच अधिक महत्त्व देत असल्याची टीका महेश कुमठळ्ळी यांनी केली.

Tags: