Belagavi

श्री समादेवी जन्मोत्सव सोहळ्याचा उत्साह : पालखी प्रदक्षिणेने बेळगावची समादेवी गल्ली दुमदुमली

Share

बेळगाव येथील समादेवी गल्लीतील श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना आणि महिला मंडळातर्फे आयोजित श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. शनिवारी मुख्य दिवशी सायंकाळी श्रींच्या पालखी प्रदक्षिणेला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला.

पालखी सोहळ्याच्या प्रारंभी विश्वस्त सुरेश पिळणकर, सुधीर मदली, राकेश कलघटगी, अध्यक्ष महादेव गावडे, सचिव विनायक शहापूरकर, महिला मंडळाच्या अध्यक्षा वर्षा सटवाणी, सचिव मंजुषा देवलापूरकर, युवा संघटना अध्यक्ष प्रवीण पिळणकर, सचिव रुपेश बापशेट आणि कार्यकारी मंडळाच्या हस्ते भावपूर्ण महारती करण्यात आली. तत्पूर्वी सकाळी चौघडा व काकड आरती आणि मूर्तीला महाअभिषेक करण्यात आला. दुपारच्या सत्रात पुराण वाचन आणि महिलांकडून देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला.

सायंकाळी श्रींची पालखी मंदिरातून बाहेर पडल्यानंतर समादेवी गल्ली, गोंधळी गल्ली, गवळी गल्ली आणि नार्वेकर गल्ली अशा पाच प्रदक्षिणा पूर्ण करून मंदिरापाशी पालखीची सांगता झाली. उद्या रविवार, दि. १ फेब्रुवारी रोजी सकाळी ६:३० ते ११ वाजेपर्यंत नवचंडिका होम आणि दुपारी १२ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे.

Tags: