बेळगाव तालुक्यातील बहाद्दरवाडी गावात प्रस्तावित असलेल्या कचरा डेपो प्रकल्पाच्या विरोधात ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. जनवस्ती आणि सार्वजनिक सुविधांच्या परिसरात हा प्रकल्प उभारला जात असल्याचा आरोप करत शेकडो ग्रामस्थांनी आज बेळगाव तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने केली.

बहाद्दरवाडी गावातील प्रस्तावित कचरा प्रकल्पाच्या जागेजवळ शाळा, पिण्याच्या पाण्याचा तलाव आणि स्मशानभूमी आहे. या प्रकल्पामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊन पर्यावरणाची हानी होईल, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. “गेल्या तीन वर्षांपासून आम्ही या प्रकल्पाला विरोध करत आहोत, मात्र प्रशासन आमचे म्हणणे ऐकून घ्यायला तयार नाही,” अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना ग्रामस्थ राकेश पाटील म्हणाले की, “आरोग्य किंवा पर्यावरण विभागाची कोणतीही रीतसर परवानगी न घेता आणि ग्रामस्थांना विश्वासात न घेता प्रशासकीय कागदपत्रांवर या प्रकल्पाची नोंद करण्यात आली आहे. हा प्रकल्प त्वरित रद्द न झाल्यास आम्ही अधिक तीव्र लढा देऊ.”
आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर केले. या निवेदनाची दखल घेऊन तहसीलदारांनी सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे. या आंदोलनात बहाद्दरवाडी गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Recent Comments