बेळगावमध्ये आज ‘सौहार्द कर्नाटक वेदिके’च्या वतीने जातीय सलोखा आणि मानवी मूल्यांच्या जपणुकीसाठी महत्त्वपूर्ण मेळावा पार पडला. शांतता आणि अहिंसेच्या माध्यमातून भारताची एकात्मता टिकवून ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला असून, आगामी हुतात्मा दिनानिमित्त संपूर्ण जिल्ह्यात सलोखा जागृती अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बेळगावच्या नागनूर रुद्राक्षी मठाचे डॉ. अल्लमप्रभू महास्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला. महात्मा गांधीजींच्या ३० जानेवारी या हुतात्मा दिनाचे औचित्य साधून जिल्हाभर शांततेचा संदेश पोहोचवण्यासाठी समितीने पुढाकार घेतला आहे. याप्रसंगी उपस्थित विविध धर्मगुरुंनी आणि मान्यवरांनी जात-धर्माच्या पलीकडे जाऊन सामाजिक ऐक्य जपण्याचे आवाहन केले. भारतीयत्वाची भावना द्वेषाच्या आगीत होरपळत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत संकुचित शक्तींचा सामना करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमात बोलताना मेथोडिस्ट चर्चचे जयवंत डी. एस. यांनी समाजातील अदृश्य शक्ती फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याबद्दल सावध केले. २१ व्या शतकात द्वेषापेक्षा प्रेमाने देश घडवण्याची गरज असून महात्मा गांधींचे अहिंसेचे तत्त्वच आपल्याला मार्गदर्शक ठरेल, असे जयवंत डी. एस. यांनी म्हटले. मानवी शरीरातील रक्त एकच असताना धर्माच्या नावावर भेदभाव करणे चुकीचे असून परस्परांमधील सलोख्यानेच सुदृढ समाज निर्माण होईल, अशी भावना जयवंत डी. एस. यांनी व्यक्त केली.
या मेळाव्यात जे. नंदकुमार डी. एस., डॉ. यल्लाप्पा हिम्मडी, जी. एम. जैनेखान, मौलाना मुश्ताक अहमद अश्रफी, डॉ. डी. एस. चौगुले, जी. व्ही. कुलकर्णी, नागेश सातेरी, अशोक चंदरगी, सिद्धप्पा कांबळे, रवींद्र नायकर यांच्यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments