Belagavi

वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधीलकी; निराधार वृद्धांना धान्य वाटप

Share

वाढदिवसाच्या झगमगाटात आणि अनावश्यक खर्चात वेळ न घालवता भुकेलेल्यांना अन्नदान करणे हेच सर्वश्रेष्ठ कार्य आहे. बेळगावमधील लक्ष्मी टेक येथील ‘जीवन आधार आश्रमा’तील निराश्रित वृद्ध महिलांच्या आयुष्यात मदतीचा ओलावा निर्माण करत शोभा काळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.

बेळगावच्या सैनिक नगर, लक्ष्मी टेक येथील ‘जीवन आधार आश्रम’ येथे आज एक अर्थपूर्ण सेवा उपक्रम पार पडला. या आश्रमात आश्रय घेतलेल्या २५ हून अधिक निराश्रित वृद्ध महिलांना दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेल्या अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. संस्थेचे उपाध्यक्ष अरुण काळे यांच्या भगिनी शोभा काळे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च उचलला असून, वृद्धांची भूक भागवून माणुसकीचे दर्शन घडवले आहे.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आश्रमातील आजींसोबत वेळ घालवून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या सेवाकार्यात सुनील मुत्तगेकर, शिवकुमार हिरेमठ, आकाश लाटकर, राहुल बेलवलकर, अजित कोकणे, आनंद कुलकर्णी, सुनील पवार, मधू बेळगावकर, अरुण काळे आणि प्रकाश तानजी यांच्यासह अनेक सदस्यांनी उपस्थित राहून आपले योगदान दिले. शोभा काळे यांच्या या उपक्रमाचे आश्रमातील रहिवासी आणि नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.

Tags: