Belagavi

‘व्हीबीजी रामजी’ फेटाळा आणि मनरेगा वाचवा; बेळगावात शेकडो मजुरांचा तालुका पंचायतीवर धडक मोर्चा

Share

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून ग्रामीण मजूर संघटनेच्या वतीने केंद्र सरकारच्या ‘व्हीबीजी रामजी’ योजनेचा निषेध करण्यात आला. “नवे बदल फेटाळा आणि मनरेगा वाचवा” अशी हाक देत मजुरांनी आज बेळगाव तालुका पंचायत कार्यालयासमोर भव्य निदर्शने केली.

यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या नवीन धोरणांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. संघटनेच्या नेत्या शकुंतला यांनी सांगितले की, “महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील (मनरेगा) नवीन बदलांमुळे मजुरांच्या कामाच्या हक्कावर गदा आली आहे. जुन्या कायद्यानुसार ‘फॉर्म नंबर ६’ अन्वये मागणी केल्यावर १० दिवसांत काम मिळणे बंधनकारक होते, अन्यथा भत्ता दिला जात असे. मात्र, आता केंद्र सरकार जेव्हा काम देईल, तेव्हाच मजुरांना काम करावे लागणार आहे, ही मजुरांची मोठी फसवणूक आहे.”

या नवीन नियमांमुळे ग्रामीण भागातून शहराकडे होणारे स्थलांतर थांबण्याऐवजी वाढणार आहे, असा आरोप मजुरांनी केला. या बदलांचा थेट परिणाम गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणावरही होत आहे. “आम्हाला नवीन डिजिटल उपस्थितीचे अवडंबर नको, तर मजुरांना संरक्षण देणारा जुना कायदा जसाच्या तसा लागू करा,” अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात ग्रामीण भागातील मजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी तालुका पंचायत प्रशासनाला सादर केले.

Tags: