गरिबांच्या हक्काचा रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला असून, चिक्कोडी अन्न विभागाने सदलगा येथे धाड टाकून ४ टन तांदूळ जप्त केला आहे.

सदलगा शहरातील प्रकाश नगर भागात रेशनच्या तांदळाचा मोठा साठा अवैधपणे दडवून ठेवल्याची खात्रीशीर माहिती प्रशासनाला मिळाली होती. सहाय्यक आयुक्त सुभाष संपगावी आणि तहसीलदार राजेश बुर्ली यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न निरीक्षक ऐश्वर्या दिवटे, महसूल शिरस्तेदार हनुमंत खांडेकर व सदलगा पोलीस उपनिरीक्षकांच्या पथकाने हा छापा टाकला. यावेळी सुमारे ४ टन तांदूळ हस्तगत करण्यात आला असून, सुनील बागडी याने हा साठा केल्याचा आरोप आहे.
गरिबांच्या वाट्याचे अन्न हडप करून त्याची काळ्या बाजारात तस्करी करणाऱ्यांविरुद्ध अन्न विभागाने ही धडक मोहीम राबवली आहे. याप्रकरणी सदलगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रशासन या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.


Recent Comments