कर्नाटक राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे ज्येष्ठ कामगार नेते आणि एआयटीयुसीचे प्रदेशाध्यक्ष कॉम्रेड एच. यू. अनंत सुब्बाराव यांच्या निधनाबद्दल बेळगावात शोक व्यक्त करण्यात आला. परिवहन कर्मचाऱ्यांची शक्ती असलेल्या सुब्बाराव यांच्या समर्पित कार्याचे स्मरण यावेळी विविध कामगार नेत्यांनी केले.

केएसआरटीसी कर्मचारी आणि कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष कॉम्रेड एच. यू. अनंत सुब्बाराव यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आगामी आंदोलनाची रूपरेषा ठरवून, पत्रकार परिषद आटोपून घरी परतत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. राष्ट्रीय स्तरावरील परिवहन कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष आणि सीपीआय नेते म्हणून त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय असल्याचे गौरवोद्गार यावेळी मान्यवरांनी काढले.
श्रद्धांजली सभेचे नेतृत्व करताना मानद अध्यक्ष सी. एस. बिडनाळ यांनी सुब्बाराव यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. अनंत सुब्बाराव हे मी परिवहन मंत्री असल्यापासूनचे निकटचे स्नेही होते. ते अत्यंत निष्ठावान, धर्मनिरपेक्ष नेते आणि कामगारांचा बुलंद आवाज होते, त्यांच्या जाण्याने राज्यातील कामगार क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे, अशा भावना सी. एस. बिडनाळ यांनी व्यक्त केल्या.
या श्रद्धांजली सभेला सुरेश रेड्डी, एस. व्ही. माने, वाय. जी. बनसूर, एस. एन. बेन्नी, राजू पन्न्यागोळ यांच्यासह अनेक कामगार नेते आणि परिवहन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments