State

लाच घेताना रंगेहात पकडलेल्या इन्स्पेक्टरचा हायड्रामा

Share

बेंगळुरूमध्ये लोकयुक्त पोलिसांनी भ्रष्टाचाराविरोधात मोठी मोहीम राबवली असून, चिटफंड प्रकरणाचा निकाल लावण्यासाठी ४ लाख रुपयांची लाच घेताना के.पी. अग्रहारा पोलीस ठाण्याचे इन्स्पेक्टर गोविंदराजू यांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

के.पी. अग्रहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिटफंड व्यवहारावरून एक वाद सुरू होता. या प्रकरणात आरोपीचे नाव वगळण्यासाठी किंवा प्रकरणाची तडजोड करण्यासाठी इन्स्पेक्टर गोविंदराजू यांनी तक्रारदाराकडे ४ लाख रुपयांची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लोकयुक्त पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली होती.

लोकयुक्तांचे पोलीस अधीक्षक शिवप्रकाश यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शिरसी सर्कलजवळील सीएआर मैदानाजवळ सापळा रचला होता. ठरल्याप्रमाणे इन्स्पेक्टर गोविंदराजू यांनी लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर झडप घातली. पकडले गेल्याचे लक्षात येताच गोविंदराजू यांनी काही काळ गोंधळ घालत हायड्रामा केला, मात्र अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले.

सध्या आरोपी पोलीस निरीक्षकाला अटक करण्यात आली असून, त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास लोकयुक्त पोलीस करत असल्याची माहिती शिवप्रकाश यांनी दिली आहे.

Tags: