विजापूरचे भाजप आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी मंत्री शिवानंद पाटील यांच्याविरुद्ध कोणतेही अवमानकारक, मानहानीकारक किंवा अपमानास्पद विधान करू नये, असा अंतरिम आदेश बेंगळुरू येथील २७ व्या अतिरिक्त दिवाणी आणि सत्र न्यायालयाने दिला आहे.

मंत्री शिवानंद पाटील यांनी आमदार यत्नाळ यांच्या विरोधात न्यायालयात गुन्हेगारी तक्रार दाखल केली असून, या प्रकरणाची दखल घेत न्यायमूर्तींनी यत्नाळ यांच्यावर निर्बंध लादले आहेत. यत्नाळ यांनी खोटे आणि बिनबुडाचे आरोप करून आपली प्रतिमा मलीन केल्याचा दावा करत मंत्री पाटील यांनी न्यायालयात धाव घेतली होती. विविध टीव्ही मुलाखतींमध्ये यत्नाळ यांनी माझ्या विरोधात आक्षेपार्ह विधाने केली असून, माझ्या प्रतिष्ठेला तडा देण्याचा प्रयत्न केल्याचे मंत्री शिवानंद पाटील यांनी न्यायालयात म्हटले आहे.
विशेष म्हणजे, पहिली तक्रार दाखल केल्यानंतरही यत्नाळ यांनी आपली विधाने सुरूच ठेवल्यामुळे मंत्री पाटील यांना दुसऱ्यांदा न्यायालयात धाव घ्यावी लागली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत आणि त्यानंतर विजापूर येथील एका निषेध सभेत यत्नाळ यांनी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यांचा दाखला मंत्र्यांनी आपल्या तक्रारीत दिला आहे.
या दोन्ही तक्रारींच्या आधारे यत्नाळ यांच्याविरुद्ध आता फौजदारी गुन्हा दाखल झाला असून, बेंगळुरू येथील ४२ व्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर या प्रकरणाची पुढील सुनावणी पार पडणार आहे, अशी माहिती मंत्री शिवानंद पाटील यांनी दिली आहे.


Recent Comments